मराठी चित्रपटसृष्टीने नेहमीच रहस्य, थरार आणि मानवी अस्तित्वाशी संबंधित वेगळ्या विषयांना प्रेक्षकांसमोर मांडले आहे. याच परंपरेला पुढे नेत आगामी मराठी सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट ‘मृत्यूचक्र’ मृत्यू, कर्म, मानवी अस्तित्व आणि त्यामागील गूढ शक्तींचा शोध घेणारी कथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून, त्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढवली आहे. हा चित्रपट 23 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमाला सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे विश्वस्त राजाराम देशमुख, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले आणि उपाध्यक्ष धनाजी यमकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

श्री महादेव फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत आणि अध्यांश मोशन पिक्चर निर्मित या चित्रपटाची निर्मिती प्रणली उन्मेष वाघमोडे यांनी केली आहे. विलास वाघमोडे आणि अनुप्रिता कडू-गांगवणे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

‘मृत्यूचक्र’च्या ट्रेलरमध्ये सुरुवातीपासूनच गूढ आणि भयावह वातावरण निर्माण करण्यात आले आहे. एका रहस्यमय चक्राची सतत ऐकू येणारी टिक-टिक, धूसर प्रकाशात दिसणाऱ्या प्राचीन वास्तू, अंधाराचे सावट, सीरियल किलरची दहशत आणि अंगावर काटा आणणारे पार्श्वसंगीत यामुळे ट्रेलर अधिक थरारक बनतो. ग्रामीण पार्श्वभूमी आणि साधी वेशभूषा असलेल्या व्यक्तिरेखांच्या चेहऱ्यावरील गूढ भाव प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करतात.

चित्रपटातील हॉस्पिटलमधील प्रसंग आणि वैद्यकीय परिस्थितीही कथानकाचा महत्त्वाचा भाग असल्याचे ट्रेलरवरून दिसते. मानवी बुद्धीला समजणाऱ्या वास्तवाचा आणि त्यापलीकडील रहस्यमय शक्तींचा संघर्ष कथेला वेगळे वळण देतो. प्रत्येक प्रसंगानंतर पुढे काय होणार, याची उत्सुकता कायम राहते.

ट्रेलरमधील “It begins where it ended… the cycle of death – Mrutyuchakra…” हा संवाद चित्रपटाच्या मध्यवर्ती संकल्पनेची झलक देतो. त्याचबरोबर “Behind every death lies an invisible shadow…” ही ओळ मृत्यूमागील अदृश्य रहस्य अधिक गडद करते.

दिग्दर्शकांच्या मते, ‘मृत्यूचक्र’ हा केवळ रहस्य आणि थराराचा चित्रपट नसून मृत्यू, कर्म आणि मानवी अस्तित्वाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न आहे. ट्रेलरमध्ये चित्रपटाच्या मुख्य रहस्याचा आणि विविध घटनांना जोडणाऱ्या धाग्याचा खुलासा जाणीवपूर्वक करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता चित्रपटगृहापर्यंत कायम राहावी, असा प्रयत्न करण्यात आला आहे.

चित्रपटात शशांक शेंडे, अक्षया गुरव, पुष्कराज चिरपुटकर, आस्ताद काळे, वर्षा दांडले, कृतिका तुळसकर, सानिका बनारसवाले, संजय शेजवळ, शालका गाडे, शारा गायकवाड, जितेंद्र पोळ आणि अनिल राबले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटाची मूळ कथा डॉ. सुधीर निकम यांची असून पटकथा आणि संवाद विलास वाघमोडे आणि डॉ. सुधीर निकम यांनी लिहिले आहेत. रोहन शाह क्रिएटिव्ह प्रोड्यूसर आहेत. केदार दिवेकर यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत दिले आहे. निशांत भागवत यांनी छायांकन, तर राहुल भाटणकर यांनी संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे.

महाराष्ट्रातील चित्रपटाचे वितरण UJM Networks & Entertainment LLPच्या माध्यमातून केले जाणार आहे. ‘मृत्यूचक्र’ 23 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार असून मृत्यू, कर्म आणि रहस्याचा हा गूढ खेळ प्रेक्षकांना कितपत थरारून सोडतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Subscribe Deshwale on YouTube

Join Our Whatsapp Group

Share.

Comments are closed.

Exit mobile version